धक्कादायक ! भाऊ बहिणीच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या भावोजींची केली हत्या

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोघा भावांनी मित्राच्या मदतीने आपल्याच बहिणीच्या नवऱ्याचा खून केला आहे. 21 वर्षीय तरुणाची हत्या केल्यानंतर तिघेही जण घटनास्थळावरुन पसार झाले. भावा- बहिणींच्या वादात भावोजींनी मध्यस्थी केल्याने मेहुण्यांनी त्यांचा खून केला आहे. अमरावती शहरालगत असलेल्या वलगाव येथील दर्यापूर मार्गावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीने यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कन्हैय्या शंकर पवार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?
अमरावती शहरालगत असलेल्या वलगाव येथील दर्यापूर मार्गावर पाल ठोकून राहणाऱ्या कन्हैय्या शंकर पवार या तरुणाची हत्या करण्यात आली. त्याच्या दोन मेहुण्यांनी आपल्या मित्राच्या मदतीने ही हत्या केल्याचा आरोप मृत कन्हैय्याच्या पत्नीने केला आहे.

वादात मध्यस्थी केल्याचा राग
आरोपी मेव्हण्याचा त्याच्या मित्रासोबत वाद सुरु आहे. या भांडणात मध्यस्थी केली म्हणून मेव्हण्यांनी आणि त्यांच्या एका मित्राने भावोजींचीच हत्या केली. हा खून केल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. मृत कन्हैय्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून तिघा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वलगाव पोलिस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहेत.

दोनच दिवसांपूर्वी बहिणीच्या घरी वाद
दोन दिवसांपूर्वीच तक्रारदार गंगाचे दोन भाऊ म्हणजेच मृत कन्हैयाचे मेव्हणे किसन आणि राजेश हे बहिणीकडे आले होते. यावेळी किसन आणि राजेश यांचा आपसात वाद झाला होता.