मुंबई । श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळं मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना डिस्चार्जनंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवनीत राणा यांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आता मुंबई महापालिकेनं नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची कोरोना चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, पालिकेनं राणा दाम्पत्यांना १५ दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे.
काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांच्या कुटुंबातील १२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सर्वात प्रथम समोर आलं. त्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांचेही करोनाची चाचणी केल्यानंतर त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सुरुवातीला अमरावतीतील घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ५ दिवसांनंतरही प्रकृतीत काहीच सुधारणा न झाल्यानं त्यांना नागपूरच्या रुग्णलयात हलवण्यात आलं होतं.
नवनीत राणा यांना नागपूरमधील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं उपचार सुरू असतानाच प्रकृती अधिकच खालावल्यानंतर त्यांना तातडीनं मुंबईला हलवण्यात आलं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी त्यांना आयसीयूतून सर्वसाधारण कक्षामध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. त्यांनतर २ दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. मुंबई महापालिकेनं पुन्हा त्यांची नवनीत राणा आणि रवी राणा यांची करोना चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”