Sunday, June 4, 2023

महाबळेश्वरच्या विकासासाठी 51 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता – जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र असलेल्या महाबळेश्वरचा कायापालट लवकरच केला जाणार आहे. कारण महाबळेश्वरला पर्यटन वाढीसाठी तसेच विकासासाठी 51 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच महाबळेश्वरच्या मार्केटचा कायापालट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाबळेश्वर पर्यटन तसेच शहर विकासासाठी प्राप्त झालेल्या निधीतून अनेक कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते सुधारणा, मार्केट मध्ये लायटिंग, रंगरंगोटी, गल्लीबोळातील लहान रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे.

महाबळेश्वर पर्यटन विकासाच्या वाढीसह तापोळा, बामणोली या जलाशयाच्या ठिकाणीही फ्रेश वॉटर डायविंगची संकल्पना राबवण्यात येणार आहे. तसेच याच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी महाबळेश्वरचा कायापालट करण्यात येणार असून स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.