ठाणे : हॅलो महाराष्ट्र – आजकाल गुन्हेगारीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या अशीच एक घटना ठाण्यातील वर्तकनगर परिसरात घडली आहे. यामध्ये मोबाईल चार्जिंगवरुन झालेल्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
पोलिसाांनी दिलेल्या माहितीनुसाार, ठाण्यातील लोकमान्य नगर येथे राहणाऱ्या साहिल आणि अभिषेक यांच्यात मोबाईल चार्जिंगच्या कारणावरून मोठा वाद झाला. कशामुळे हा वाद झाला हे जाणून घेण्यासाठी सुमित राऊत गेला होता. तेव्हा साहिल आणि अभिषेक यांना सुमित राऊतचा राग आला. याच रागातून त्यांनी अन्य मित्रांच्या सहाय्याने धारदार शास्त्राने अंगावर वार करत सुमितवर जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला एवढा भयंकर होता कि सुमितचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून दोघेजण अजून फरार आहेत. पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहेत. हे सगळे अट्टल गुन्हेगार असल्याचं निदर्शनास आले आहे. या आरोपींपैकी एक जण अल्पवयीन आहे. वर्तक नगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या सर्व प्रकरणामध्ये सुमित राऊत याचे नातेवाईक आक्रमक झाले असून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. नाहीतर ‘आरोपींना आमच्या ताब्यात द्या, आमच्या मुलाच्या खुनाचा बदला आम्ही घेऊ’ अशी मागणी सुमितच्या कुटुंबीयांनी केली आहे.