सांगली । पलूस तालुक्यातल्या अंकलखोप परिसरात गव्याचे दर्शन झाले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अंकलखोप परिसरातील नागरिक पहाठे ५ च्या सुमारास येथिल सिध्देश्वर मंदीर, अंकलेश्वर मंदीरापासुन झेंडा चौकातुन गवा रेडा वावरताना दिसून आला. या गाव्याला पहाठे उठलेल्या अमर शिसाळ सह काही युवकांनी हुसाकावुन लावला. तो गावातील विविध भागात फिरून पुन्हा चावडीच्या पाठीमागिल शेतात गेला आहे. असे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले.
परिसरात काही नागरिकांनी मोबाईलच्या सहाय्याने त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण केले. परंतु सर्वत्र अंधार असल्यामुळे केलेले चित्रीकरण स्पष्ट दिसत नाही. काही भागातील सीसीटिव्ही फुटेज मध्ये ही मुक्तपणे गवा रेडा गावाततुन वावरत असल्याचे दिसत आहे. सध्या सोशल मिडीयावर त्याचे व्हिडीऑ फिरत आहेत. मागिल काही दिवसांपूर्वीही आष्टा रस्त्यावर एक गवा आढळला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. अंकलखोप येथे ऊस पिकांचे मोठे क्षेत्र आहे त्यामुळे सदर परिसरात लपण्यासाठी खुप जागा आहे. या परिसरापासुन जवळच नदी काठ परिसरात शेतकऱ्यांची घरेही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामळे शेतकऱ्यांबरोबरच इतर नागरिकांची या रस्त्यावर ये-जा सुरू असते.
या परिसरात जंगली गव्यांचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या जंगली गव्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या कडून होत आहे. दरम्यान कृष्णानदी काठच्या ऊस पिकात संबंधीत गवा लपुन बसला आहे. सकाळी काही शेतकरी मोटर सुरू करण्यासाठी गेले असता. त्यांना शेतात गवा रेडा पाहावयास मिळाला. यात काही शेतकरी वर्गावर धाव घेण्याचा प्रयत्न गव्याने केला आहे.