कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
अनेकवेळा चोरट्यांकडून चोरीच्या घटना घडतात. मात्र, त्यांच्या हाती कधी मोठं घबाड लागतं तर कधी त्यांची घोर निराशा होते. चोरट्यांनी चोरी करण्याची वेळही खास असते. कधी रात्रीच्यावेळी तर कधी पहाटेच्या साखर झोपेत होय. अशीच एक चोरीची घटना कराड तालुक्यातील एका गावात घडली आहे. पहाटेच्यावेळी ग्रामस्थ साखर झोपेत असल्याचे पाहून चोरांनी तीन घरे फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना एकच घर फोडता आलं. घरात शिरल्यानंतर इतरत्र शोधून काहीच सापडले नसल्याने चोरटयांनी घरातील साहित्य, कपडे इतरत्र विस्कटली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील वहागाव येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांकडून तीन घरे फोडण्यात आली. फोडण्यात आलेल्या तीन घरांपैकी दोन घरे बंद होती. चोरट्यानी ही घरे फोडण्यासाठी जाताना शेतातील मार्गाची निवड करण्याचा निर्णय घेतला. घराचे कुलूप व कोंयडा तोडून आत प्रवेश करत घरातील तिजोरी व कपाटही त्यांनी फोडले. यावेळी त्यांना बंद घरात कोणताही किमती ऐवज मिळाला नाही. त्यामुळे संतापाच्या भरात त्यांनी घरातील सामान विस्कटत मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे.
या बंद घरातील नागरिक नोकरीनिमित्त परगावी राहण्यास असल्याने चोरटयांनी घर फोडले. त्यानंतर चोरटयांनी वस्तीवर आणखी एक घर फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या घरातील नागरिक जागे झाल्यामुळे त्या ठिकाणाहून चोरट्यानी पलायन केले. दरम्यान या प्रकारामुळे वहागाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी वहागाव ग्रामस्थांनी केली आहे.