अनिल अंबानीचा महाबळेश्वरमध्ये वाॅक, संचारबंदीत मैदानावर वाॅक केल्याने संस्थेला पालिकेची कारवाईची नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

लाॅकडाऊनमुळे संचारबंदीत प्रसिध्द उदयोगपती अनिल अंबानी हे आपली पत्नी टिना अंबानीसह  महाबळेश्वर येथील एका मैदानावर इव्हिनिंग वॉक घेत होते. त्या मैदानाची मालकी असलेल्या संस्थेला पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी नोटीस बजावुन दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे पालिकेने नोटीस बजावल्यानंतर दि क्लब गोल्फ मैदानाला टाळे ठोकले आहेत. आता या मैदानावर कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणुन महाबळेश्वर हे प्रसिध्द आहे. येथील थंड हवा आणि निसर्ग पाहण्यासाठी देशातील तसेच परदेशातील अनेक नामवंत हे नेहमी आपल्या कुटूंबा बरोबर येथे वरचेवर येत असतात. उदयोग विश्वात ज्यांच्या नावाचा बोलबाला आहे, असे अंबानी बंधु हे देखिल आपल्या कुटूंबा बरोबर वरचेवर महाबळेश्वरला भेट देतात. मुकेश अंबानी हे देखिल महाबळेश्वरवर नितांत प्रेम आहे त्यांनी आपली मुलीचा साखरपुडयाचा कौटुंबिक सोहळा येथेच आयोजित केला होता. मुकेश अंबानी प्रमाणे त्यांचे बंधु अनिल अंबानी हे देखिल नेहमी कुटूंबासह महाबळेश्वरला नेहमी येत असतात. सध्या देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. याच काळात अनिल अंबानी हे आपली पत्नी टिना अंबानीसह महाबळेश्वर येथे आले आहेत. सध्या ते देशातील डायमंड किंग म्हणुन प्रसिध्द असलेले उदयोगपती अनुम मेहता यांच्या लाल बंगल्यात मुक्कामी आहेत. गेली अनेक दिवस येथे मुक्कामी असलेले उदयोगपती अनिल अंबानी यांना रोज सकाळ आणि संध्याकाळी वॉकसाठी बाहेर पडण्याची सवय आहे. मुंबई असो वा महाबळेश्वर ते वॉक कधीच चुकवित नाहीत, वॉकची सवय असलेले अनिल अंबानी हे रोज सायंकाळी आपली पत्नी टिना अंबानीसह येथील गोल्फ मैदानावर वॉक घेण्यासाठी येतात. याच ठिकाणी गावातील काही मोजकी मंडळी देखिल वॉकसाठी नियमित येत असतात. सध्या या मैदानावर अनिल अंबानी हे आपल्या पत्नीसह रोज वॉकसाठी येतात. याची खबर शहरात पसरली त्यामुळे वॉकसाठी जी काही मंडळी इतर ठिकाणी जात होती. त्यांनी आपली रोजची जागा बदलुन येथील गोल्फ मैदानावर वॉक सुरू केला. त्यामुळे हळु हळु या मैदानावर वॉकसाठी नागरीकांची गर्दी होवु लागली.

लॉकडाउनमध्ये संचारबंदी असुन कोणालाही बाहेर पडता येत नाही, असे नियम असतानाही उदयोगपती हे नियमित वॉक घेण्यासाठी गोल्फ मैदानावर येतात. ही खबर पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना मिळाली. त्यांनी तातडीने याबाबत खात्री करून घेवुन गोल्फ मैदानाची मालकी असलेल्या दि क्लब या संस्थेच्या सचिवांना नोटीस काढली. या नोटीसमध्ये मुख्याधिकारी यांनी म्हटले आहे, की सध्या लॉकडाउन नियामांतर्गत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. असे असताना आपल्या मालकीच्या गोल्फ मैदानावर शहरातील अनेक नागरीक इव्हिनिंग वॉकसाठी येत आहेत. ही नोटीस प्राप्त होताच तातडीने गोल्फ मैदान वॉकसाठी बंद करण्यात यावे. या ठिकाणी वॉक साठी नागरीकांना मनाई करण्यात यावी, अन्यथा आपले विरूध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, भा द वि कलम 188 तसेच भारतीय साथ रोग अधिनियम 1897 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

पालिकेने बजावलेल्या या नोटीसीची दि क्लबने गंभीर दखल घेवुन नोटीस मिळतातच तातडीने गोल्फ मैदानाला टाळे ठोण्यात आले आहे. तसेच ही नोटीस प्रवेशव्दारावर लावुन नागरीकांना आज पासुन हे मैदान बंद करण्यात आले आहे. पालिकेने घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे शहरातुन कौतुक होत आहे. दरम्यान आता इव्हिनिंग वॉकसाठी कुठे जायचे हा प्रश्न उदयोगपती अनिल अंबानी यांना पडला आहे.

Leave a Comment