हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ईडीने लावला होता. या घोटाळा प्रकरणी देशमुख यांना तुरुंगवासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनी भाजपवर याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. “भाजपकडून माझ्यावरही समझोता करण्यासाठी दबाव होता, पण मी नाही सांगितलं आणि दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली” असा दावा अनिल देशमुख यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
अनिल देशमुखांचे आरोप
माध्यमांशी बोलताना, “भाजपच्या नेत्यांचा माझ्यावर समझोता करण्यासाठी दबाव होता. समझोता करण्यास नकार दिला, त्यामुळे परमवीर सिंग यांना माझ्यावर खोटे आरोप करायला लावले आणि माझ्यावर कारवाई करायला लावली, हे शंभर टक्के खरे आहे. ज्या पद्धतीने माझ्यावर दबाव होता, मी सरळ सांगितलं की मी कोणत्याही पद्धतीने समझोता करणार नाही आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्यावर रेड पडली. आणि माझ्यावर कारवाई करण्यात आली, ही वस्तुस्थिती आहे” असे देशमुख यांनी म्हणले आहे.
त्याचबरोबर, “शरद पवारसाहेब पुण्यातील कार्यक्रमात बोलले की, आमच्यातले नेते ईडीच्या भीतीने भाजपने गेले. त्यात माझ्याही नावाचा उल्लेख केला, ते खरं आहे.” असं ही त्यांनी म्हणल आहे. यापूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना, “अलीकडेच आमचे काही लोक सरकारमध्ये सामील झाले आहेत. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर गेलो असं ते सांगत आहे. पण त्याला फारसा अर्थ नाी. त्यापैकी काही ईडीच्या चौकशीत होते. त्यातील काहींना तपासाला सामोरे जावेसं वाटलं नाही, तर अनिल देशमुख यांच्या सारख्या काहींनी तुरुंगात जाणं पसंत केलं.” असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हणल होत.
शंभर कोटी खंडणी प्रकरण
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर करून त्यांनी शंभर कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप लावण्यात आला होता. सीबीआयने या प्रकरणात देशमुख यांच्यासह त्यांचे सहाय्यक कुंदन शिंदे, संदीप पलांडे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. परंतु पुढे जाऊन, गैरव्यवहाराचा आकडा १०० कोटी पेक्षा कमी करण्यात आला होता. त्या काळात ईडीने आणि देशमुख यांच्यावर लावलेल्या आरोपांमुळे त्यांना वर्षभर तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.