जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी
जामनेर तालुक्यातील सामरोद – मोयखेडा रत्या नजिक असलेल्या पाणवठ्याजवळ १९ नीलगायी आणि १० रानडुकरांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या पाण्यात विषारी पदार्थ असल्याने हे पाणी पिल्याने या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
जामनेर तालुक्यातील सामरोद – मोयखेडा रत्या नजिक पाळीव प्राणी आणि काही जंगलातील वन्य जीवनसाठी पाणवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या पाणवठ्यावर सर्व प्राणी हे पाणी पीत असतात परंतु आज या पाणवठ्यावरील पाणी पिल्याने १९ नीलगायी आणि १० रानडुकरांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटना स्थळी वनविभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला असुन पाणवठातील पाण्यात विष असल्याने विष बाधा होवुन या वन्यजीवांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वर्तवला आहे.
या बाबत वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील या बाबत चौकशी करत असून परिसरात वन्यजीवांची संख्या अधिक आहे त्यामुळे अज्ञात शेतकऱ्याने या पाणवठात विष कालवल्याचा अंदाज ही वर्तवला जातोय. मात्र अशा वन्यजीवांच्या दुर्दैवी मृत्यू मुळे वन्यजीवप्रेमी मध्ये संताप व्यक्त केला जातोय.




