लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण…; अण्णा हजारेंची सरकारवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारच्या या निर्णयावरून ताशेरे ओढले आहेत. लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे असा अट्टाहास या निर्णयामागे दिसून येतो अशी टीका अण्णा हजारे यांनी केली आहे. अण्णा हजारे यांनी याबाबत एक पत्रकच जारी केलं आहे.

महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे असेच म्हणावे लागेल. एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचं सांगत आहे. तसेच वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येत आहे. असे निर्णय ह्या राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न आहे. असे अण्णा हजारे यांनी म्हंटल.

शेतकऱ्यांचेच हित पहायचे असेल तर गोरगरीब, सामान्य शेतकरी आपल्या शेतात जे पिकवतो त्याला राज्य आणि केंद्र सरकारने हमी भाव द्यायला हवा. पण त्याकडे रीतसर दुर्लक्ष करून अशा प्रकारे वाईनची खुली विक्री करून एक वर्षात 1 हजार कोटी लिटर वाईन विक्रीचे उद्दीष्ट ठेवणारे सरकार यातून नेमके काय साध्य करणार? हा खरा प्रश्न आहे.

20 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या आणखी एका निर्णयात याच सरकारने आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्के केलेले आहे. उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करून हे मद्य स्वस्त करण्यात आले. यातून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल आणि सरकारला मिळणारा महसूल 100 कोटीवरून 250 कोटीवर जाईल असा विचार सरकारने केला असल्याचे समजते. याचाच अर्थ लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे असा अट्टाहास दिसून येतो.

Leave a Comment