हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत आघाडी करून स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला या महिन्याच्या अखेरीस एक वर्ष पूर्ण होत आहे. दरम्यान, राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा, अशी परिस्थिती आहे, असा टोला अण्णांनी लगावला आहे.
लोकपालनंतर लोकायुक्त कायदा तयार करायचा आहे. या कायद्याचा मसुदाही तयार करण्यात आला आहे. यासाठी मी राज्य सरकार मधील अनेक मंत्र्यांना पत्रं लिहिली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडता कोणाचेही उत्तर आले नाही. कोरोना परिस्थितीनंतर आपण पाहू असे, मुख्यमंत्र्यांनी उत्तर पाठवलं असल्याचे अण्णा म्हणाले. हा कायदा जर आणला नाही तर मी पुन्हा आंदोलन करणार असल्याचेही अण्णांनी सांगितले.
आजचं राजकारण हे ध्येयवादी राहिलेलं नाही. नेत्यांमध्ये दूरदृष्टी राहिली नाही. सामाजिक दृष्टीकोण नाही. आता फक्त सत्ता आणि पैसा यासाठी राजकारण सुरु आहे. लाखो लोकांनी दिलेलं बलिदान हे राजकाणी विसरले आहेत. सध्याच्या राजकारणातून सेवाभावी भाव दूर गेला असल्याची खंत अण्णांनी बोलून दाखवली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’




