हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून अनेक प्रकारची आंदोलने करण्यात आलेली आहे. त्यांनी आज पुन्हा आपला आक्रमक पावित्रा घेतला आहे. आता त्यांनी लोकायुक्ताच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “लोकायुक्त कायदा बनविण्याचे लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच झालेले नाही. त्यामुळे एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा, असा इशारा अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
अण्णा हजारे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, फडणवीसांच्या काळात लोकायुक्त कायदा तयार करण्याचे आश्वासन दिले होते. फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार पायउतार झाल्यानंतर सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारनेदेखील लोकायुक्त कायदा तयार करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. लोकायुक्त कायद्याच्या अनुषंगाने सात बैठकाही घेण्यात आल्या. मात्र, दोन वर्ष उलटून गेले तरी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर बोलण्यास तयार नाहीत.
मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कायद्या संदर्भात लवकर निर्णय घ्या, अशी मागणी केली आहे. मात्र, ते यावर बोलायला तयार नाहीत. नेमके काय झाले हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठे जनआंदोलन करण्याची गरज आहे, असा एक प्रकारचा इशाराच हजारे यांनी दिला आहे.