हॅलो महाराष्ट्र आनलाइन: अंधश्रद्धा, जादूटोणा, चमत्कार करून पाच कोटी रुपयांचा पाऊस पाडतो असे सांगून भोंदूबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हडपसर परिसरातील एका युवकाची १८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा सगळा प्रकार महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा असून या कायद्याच्या कलम 3 नुसार भोंदूबाबा आणि सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल यांनी केली आहे.
युनिव्हर्सल शाळेशेजारी असलेल्या एका बंगल्यामध्ये भोंदूबाबा पूजा मांडून बसला होता. पैशांचा पाऊस पाडतो असे सांगून १८ लाख रुपये भरा, त्याचे तुम्हाला ५ कोटी रुपये करून देतो असे आमिष त्याने दिले होते. अधिक पैसे मिळवण्याच्या आमिषाला बळी पडून चमत्कार जादूटोण्याच्या आहारी गेलेल्या एका तरुणाने १८ लाख रुपये बाबाला दिले. त्यांनतर तोतया पोलिसांचे पथक तेथे आले आणि ते १८ लाख रुपये व भोंदूबाबाला घेऊन गेले. मात्र पोलिस हे तोतया असून भोंदूबाबा आणि सहकाऱ्यांनी ही एकत्रित येऊन फसवणूक केल्याचे तरुणांच्या नंतर लक्षात आले. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी हा प्रकार घडला आहे. यासंबंधी तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. भोंदूबाबा आयरा शाब, माधुरी मोरे, रॉकी वैद्य, किशोर पांडागळे यांच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्यात जादूटोणाविरोधी कायद्याची कलमे समाविष्ट केलेली नाहीत.
पैशाचा पाऊस पाडण्याचा चमत्कार घडवून आणण्याचा दावा करून त्यासाठी आर्थिक फसवणूक करणे हा महाराष्ट्रात १० वर्षांपासून लागू असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. युवकाची १८ लाख रुपयांची फसवणूक करून चमत्काराद्वारे पाच कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविणे हा जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम 3 स्वरूपानुसार गुन्हा आहे. त्यामुळे भोंदूबाबा आणि या फसवणूक प्रकारात सहभागी असणाऱ्या सहकाऱ्यांविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विशाल विमल यांनी केली आहे.
पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, वेळीअवेळी पाऊस का पडतो आणि त्याच्यामागे असलेल्या कार्यकारणभावाची माहिती प्राथमिक शाळेत मिळते. मात्र आपल्या समाजात हा कार्यकारणभाव अजूनही लक्षात घेतला जात नसल्याने पैशाचा पाऊस पडण्याच्या आमिषावर लोक विश्वास ठेवत आहेत. पैशाच्या पावसातून आर्थिक प्राप्ती होणार यासाठी स्वतःची आर्थिक फसवणूक करून घेत आहेत, ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे, असेही विशाल विमल यांनी सांगितले.