सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी धडक कारवाई करण्यात आली. यावेळी कऱ्हाड आणि खटाव तालुक्यांत दोन ठिकाणी सापळा रचून मंडलाधिकारी, तलाठ्यासह एका खासगी व्यक्तीला लाच घेताना रंगेहाथ पकडले. खटाव येथील कारवाईत तलाठी जय रामदास बर्गे (वय 32, रा. डिस्कळ, ता. खटाव, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. यातील तलाठी जय बर्गे याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डिस्कळ, ता. खटाव येथे 19 वर्षीय तक्रारदार युवकास जमिनीची खातेफोड नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी तलाठी जय बर्गे याने त्याच्याकडे सुरुवातीला 20हजारांची मागणी केली. त्यातील 10 हजार रुपये त्याने यापूर्वीच घेतले. उर्वरित 10 हजार त्याला द्यायचे होते. तत्पूर्वीच तक्रारदाराने लाचलुचपत विभागात जाऊन लेखी रीतसर तक्रार केली.
एसीबी पथकाने पडताळणी केली असता तलाठी बर्गे हा लाचेची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तलाठी जय बर्गे याने लाचेची 5 हजारांची रक्कम एका झेराॅक्स दुकानात ठेवण्यास सांगितली. त्यानुसार तक्रारदार युवकाने रक्कम दुकानात ठेवली. यानंतर बर्गे याने तेथे जाऊन लाचेची रक्कम घेताच एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले. पोलिस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.