हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील मुद्यांवर दिल्लीत आज केंद्रीय निवडणूक आयोगा कार्यालयात महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर दावा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आजच्या सुनावणीत आयोगापुढे शिंदे-ठाकरे गटाच्या वकिलाकडून जोरदार युक्तिवाद केला जात आहे.
मध्यंतरी अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटासाठी वेगवेगळे चिन्ह आणि नावे जाहीर केली होती. मात्र, दोन्ही गटाकडून पुन्हा धनुष्यबाण चिन्हावर दावा दाखवत आपले बहुमत सिद्ध केले होते. यावर आज महत्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने देण्यासाठी सुनावणी घेण्यात आली. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये पार पडलेल्या युक्तिवादावेळी जोरदार खडाजंगी झाली.
यावेळी ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल यांनी तर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. यावेळी पार पडलेल्या युक्तिवादाला शिवसेना उद्धव ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्यासह अनिल देसाई आणि अनिल परब उपस्थिती आहेत. तर शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुतणे वकील निहार ठाकरे हे उपस्थित आहेत.
यावेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवादात म्हंटले की,शिंदे गटाकडे आमदार, खासदारांचे बहुमत आहे. कायद्याच्या निकषानुसार शिंदे गटाची बाजू महत्वाची आणि योग्य आहे. शिंदे गटाची रचना शिवसेनेच्या घटनेनुसार आहे. त्यामुळे धनुष्यबाणासाठी महत्वाचे बहुमत हे शिंदे गटाकडे आहे. शिवसेनेतील 40 आमदार आणि 13 खासदार जरी शिंदे गटात गेले असले तरी त्यांना अपात्र ठरवण्यात आलेले नाही. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घ्यावा. शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. पण नंतर ती न बदलता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतले. पण त्यामुळे ते शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपद बेकायदेशीर आहे, असे महेश जेठमलानी यांनी युक्तिवादात म्हंटले.
तर वकील कपिल सिब्बल यांनी त्यांच्या युक्तिवादात म्हंटले की, सुप्रीम कोर्टात सुनावणी असेपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये. शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे हि बोगस आहे. त्यामुळे याबाबत अजून तपास करण्यात यावा, अशी मागणी सिब्बल यांनी केली आहे.
दरम्यान, शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात जवळपास साडेचार लाख प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. पण हे सगळे प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला असून यावर आता नेमका काय निर्णय दिला जाणार हे पहावे लागणार आहे.