हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. त्याचबरोबर, मनोज जरांगे पाटील यांना तातडीनं अटक करण्यात यावी, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला, जरांगे पाटलांनी सदावर्ते यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर, “मराठा शांततेत आंदोलन करत आहे, कोणी गाड्या फोडत असेल तर त्याचे समर्थन होणार नाही” असे जरांगे पाटलांनी म्हणणे आहे.
हीच का शांततामय आंदोलनाची व्याख्या?
अज्ञानकडून गाड्या फोडण्यात आल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला आहे. तसेच , “माझ्या पत्नीला, मुलीला धमक्या दिल्या जातात, माझ्या घराजवळ येत वाहनांची तोडफोड केली जाते. हीच का शांततामय आंदोलनाची व्याख्या? हे षडयंत्र आहे, सरकारने फक्त मनोज जरांगेचं ऐकू नये, त्यांना तातडीने अटक करावी अन्यथा मी सुद्धा आमरण उपोषण करेन.” अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे.
इतकेच नव्हे तर, “माझी मुलगी झेन गेल्या आठ दिवसांपासून शाळेत जात नाही. कारण तिलाही मारण्याच्या आणि माझ्या पत्नीला उचलून नेण्यापर्यंत मला धमक्या येत आहेत. अशा प्रकारचे हल्ले, असा आघात होईल, आम्हाला त्रास दिला जाईल, फोन, व्हिडीओ रेकॉर्डिंग, सोशल मीडियावरच्या धमक्या आम्हाला दिल्या जात आहे.” अशी माहिती देखील सदावर्तेंनी दिली आहे.
दरम्यान, “मला सायलेंट केलं जाऊ शकत नाही, मी या भारताचे जे पिलर असतात 50 टक्के जागांचा, ज्या खुल्या वर्गासाठी जागा असतात, त्या वाचवण्यासाठी माझा लढा आहे. या देशाला जातीत जातीत न तोललं जावं, तर गुणवत्तेत तोललं जावं, यासाठी माझा लढा आहे. माझ्या कष्टाचे आणि घामाचे नुकसान तुम्ही केलं. यापूर्वी 32 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण तुम्ही केली. त्यासंबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारण नसताना कारवाई करण्यात आली. तेव्हापासूनच मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत” असे गंभीर आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी लावले आहेत.