हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Arshad Warsi) बॉलिवूड सिनेविश्वाचा सर्किट अर्थात प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अर्शद वारसी कायम वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटांमध्ये त्याने साकारलेला सर्किट अशाच काही भूमिकांपैकी एक. या भूमिकेने अर्शद वारसीला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. आज अर्शदचे लाखों चाहते आहेत. जे त्याच्याविषयी आणि त्याच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यात रुची ठेवतात. अशातच अर्शदने आपल्या चाहत्यांना तिसरं लग्न केल्याचा सुखद धक्का दिला आहे.
होय. बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी नुकताच तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकला आहे. त्याने नुकतेच कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केल्याचे समोर आले आहे. पण तिसरं लग्न म्हणजे तिसरी बायको केली असा त्याचा अर्थ नव्हे. (Arshad Warsi) तर अर्शदने त्याची पत्नी मारिया गोरेटीसोबतचं स्पेशल मॅरेज ॲक्टअंतर्गत पुन्हा एकदा लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाला जवळपास २५ वर्ष झाली आहेत. मात्र अद्याप त्यांनी आपलं लग्न रजिस्टर्ड केलं नव्हतं आणि म्हणूनच इतक्या वर्षांनी अर्शद- मारियाने नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे.
अर्शद वारसीचं तिसरं लग्न (Arshad Warsi)
अभिनेता अर्शद वारसीने १४ फेब्रुवारी १९९९ साली मारिया गोरेटीसोबत लग्न केलं होतं. येत्या १४ फेब्रुवारी रोजी त्यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस आहे. त्यामुळे हा ‘व्हॅलेंटाइन डे’ अर्शद आणि मारियासाठी खास आहे. कारण या दिवशी दोघेही त्यांच्या लग्नाची सिल्व्हर जुबली साजरी करणार आहेत. लग्नाच्या इतक्या वर्षांत अर्शद आणि मारियाला लग्नाची नोंदणी करावी असे कधी लक्षातचं आले नाही. पण लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त अखेर त्यांनी कोर्टात नोंदणी पद्धतीने लग्न केल्याचे समोर आले आहे. अर्शद आणि मारियाने गेल्या महिन्यात २३ जानेवारी २०२४ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केले आहे.
का नव्हती केली लग्नाची नोंदणी?
एका वृत्तानुसार याविषयी बोलताना अर्शद वारसी म्हणाला की, ‘लग्न झाल्यानंतर आपल्या लग्नाची नोंदणी करण्याचा विचार कधीच आमच्या डोक्यात आला नव्हता.. आणि ते गरजेचं आहे असंही आम्हाला कधी वाटलं नव्हतं. मात्र प्रॉपर्टीच्या विषयात आणि एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर लग्नाची नोंदणी असणं गरजेचं असतं हे आम्हाला पुरतं समजलं. म्हणूनच कायद्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. अन्यथा एक जोडीदार म्हणून आम्ही एकमेकांना कमिटेड आहोत, एवढंच आमच्यासाठी पुरेसं होतं’. (Arshad Warsi)
तसेच या कोर्ट मॅरेजच्या निर्णयाबाबत बोलताना अर्शद वारसीची पत्नी मारियाने सांगितलं की, ‘गेल्या काही काळापासून मी लग्नाची नोंदणी करण्याचा विचार करत होते. अखेर २५ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ते शक्य झालं. मी एकाच व्यक्तीशी तिसऱ्यांदा लग्न केलंय’.
अर्शद आणि मारियाचा ‘वेडिंग व्हेलेंटाईन’
अर्शदने आणि मारियाने ‘व्हॅलेंटाइन डे’दिवशी लग्न करण्यामागे एक खास किस्सा आहे. तो सांगताना अभिनेता म्हणाला की, ‘मारियाच्या आई- वडिलांनी आम्हाला लवकरात लवकर लग्न करायला सांगितलं होतं. आम्ही लेंट (मारियाचं एक प्रकारचं व्रत) सुरु असल्यामुळे लग्न करू शकलो नव्हतो. त्यानंतर मी माझ्या कामात प्रचंड व्यस्त झालो’. (Arshad Warsi)
‘पण मग वर्ष वाया न घालवता आम्ही त्यावेळी जी तारीख योग्य वाटली त्या दिवशी लग्न करायचं ठरवलं आणि ती तारीख म्हणजे १४ फेब्रुवारी. म्हणूनच ‘व्हेलेंटाईन डे’दिवशी आम्ही लग्न केलं. यामुळे माझ्याकडे ‘व्हॅलेंटाइन डे’ची सर्वांत भयानक आठवण आहे. ती भयानक आठवण म्हणजे मी त्याचदिवशी लग्न केलंय’. अशी थट्टा करत त्याने आपल्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे.