कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना 81 पोस्टकार्ड शुभेच्छा पत्रे पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील कलावंत डाॅ. संदीप डाकवे यांनी पाठवली आहेत. शरद पवार यांच्याविषयी चपखल बसणारा शब्द कॅलिग्राफी मध्ये लिहून डाॅ. डाकवे यांनी वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवारांचा जनसंपर्क खेडोपाड्याात कानाकोपऱ्यात आहेत. पोस्टकार्ड हे सर्वत्र पोहोचते. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवला असल्याचे डाॅ. डाकवे यांनी सांगितले आहे. त्यांच्या या अनोख्या छंदाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गतवर्षी स्क्रिबलिंग मधून शरद पवार यांचे चित्र रेखाटले होते. सध्याच्या सोशल मिडीयाच्या युगात डाॅ. संदीप डाकवे यांनी जपलेल्या पत्रमैत्री छंदाचे विविध क्षेत्रातील दिग्गजांनी पत्र पाठूवन कौतुक केले आहे. यामध्ये खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खा. अरविंद सावंत, खा. डाॅ. अमोल कोल्हे, सिक्कीमचे माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, कविवर्य इंद्रजित भालेराव, प्राचार्य डाॅ. यशवंत पाटणे, ग्रंथमित्र शरद जोशी, विठ्ठल कामत, महंत आंबानंदगिरीजी महाराज, अक्षरमित्र ओंकार पाटील इ.च्या पत्राचा समावेश आहे.
तसेच गतवर्षी पोस्टकार्डवर 133 शब्द रेखाटून कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदरांजली वाहिली होती. डाॅ. डाकवे यांच्या 4 पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. 100 पेक्षा जास्त लोकांशी नियमित पत्रव्यवहार असतो. ‘वाचकांचा पत्रव्यवहार’ या सदरात 500 पेक्षा जास्त पत्रे प्रसिध्द झाली आहेत. त्यांच्या ‘समाजस्पंदनाची पत्रे’ या पुस्तकाचे प्रकाशन डाकघरात पोस्टमनच्या हस्ते झाले आहे. विशेष म्हणजे डाॅ. संदीप डाकवे यांनी राबवलेल्या विविध कलात्मक उपक्रमांतून गरजूंना मदत केली आहे. खडू-मोरपीस-पिंपळ-पान यावर कलाकृती, छत्री-कागदाचे आपट्याचे पान-मास्क यावर संदेश, एक दिवा जवानांसाठी, भिंत व पोस्टरमधून वारकऱ्यांना शुभेच्छा, भिंतीवर व पोस्टरवर चित्र रेखाटून जवानांना सलाम, सर्वात मोठी भित्तीपत्रिका, 54 चित्रे-83 चित्रे रेखाटून वाढदिवसाच्या शुभेच्छा, अक्षर अभंग उपक्रम, पेपर कटींग आर्ट, 50 हून अधिक पुस्तकांची मुखपृष्ठे, व्यंगचित्रे रेखाटन असे विविध कलात्मक उपक्रम राबवले आहेत. डाॅ.संदीप डाकवे यांच्या या विविध उपक्रमांची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’, ‘हायरेंज बुक ऑफ रेकाॅर्ड’ या पुस्तकात झाली आहे. शरद पवार यांना पाठवलेल्या 81 पोस्टकार्ड शुभेच्छा पत्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.