अरविंद केजरीवाल आज मुंबईत; उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काही कार्यक्रमानिमित्त आज मुंबईत येणार आहेत. यावेळी ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. ही भेट नक्कीच राजकीय असणार आहे. भाजपविरोधी मोट बांधण्याबाबत या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे सुद्धा यावेळी उपस्थित असतील. आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार विरोधात देशभरातील विरोधी पक्षांची मोट बांधण्याची चर्चा या भेटीत होऊ शकते. राज्यातील सध्याची एकूण राजकीय स्थिती पाहता ठाकरे गटाचा क्रमांक एकचा विरोधक भाजपचं असेल हे स्पष्ट आहे. अशावेळी मोदींना हादरा देण्यासाठी उद्धव ठाकरे देशातील विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करू शकतात.

दरम्यान, मार्च महिन्यात उद्धव ठाकरे मुंबईत देशभरातील विरोधी पक्षाची भव्य सभा आयोजित करणार आहेत अशा चर्चा सुद्धा सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत अवघे वर्ष राहिले असल्याने आगामी काळात राजकीय घडामोडींना वेग येणार आहेत. अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा रंगते हे पाहणं आता महत्त्वाचे आहे.