हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीच्यावतीने अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयात आर्यनच्या जामिनावर सुनावणी होत आहे. आर्यन खानच्या वकिलांनी न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. त्यात आर्यनने प्रभाकर साईल किंवा किरण गोसावी यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे न्यायालयाला शपथपत्रातून सांगितले आहे. समीर वानखेडे आणि इतरांच्यात सुरू असलेल्या आरोपांशी आर्यनचा काहीही संबंध नाही, असे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.
आज मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होत आहे. आतापर्यंतच्या तपासात आर्यन खानचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कनेक्शन उघड झाले आहे, असे एनसीबीने आपल्या असे उत्तरात म्हटले आहे. त्याची चौकशी केली जात आहे आणि प्रोटोकॉल नुसार आम्हाला योग्यरित्या शोधण्यासाठी पुरेसा वेळ हवा आहे असे उत्तर एनसीबीने हायकोर्टात दिले आहे.
दरम्यान, 20 ऑक्टोबर रोजी एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानने तातडीच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नंतर या प्रकरणात आर्यनची न्यायालयीन कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. दरम्यान आज पुन्हा जामीन अर्जावर सुनावणी घेतली जात आहे.