सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज सातारा जिल्ह्यात एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. तर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचेही प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. गेल्या चार दिवसांत 150 हून अधिक बांधितांना प्राण गमवावे लागले आहेत. जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने काही रुग्णांनी जीव गमावला आहे. अशावेळी केवळ प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे खंडाळा तालुक्यातील जगताप हाॅस्पिटलमधील 54 ऑक्सिजन बेडची सुविधा नादुरूस्त अवस्थेत आहे.
जिल्ह्यातील अनेक कोव्हिड सेंटर बाहेर ऑक्सिजनचा बेड मिळाविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक धावपळ करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खंडाळा तालुक्यातील जगताप हॉस्पिटलमध्ये 54 ऑक्सिजन बेडची सुविधा असताना, देखील ही यंत्रणा नादुरुस्त असल्याने धूळखात पडून आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी आज अचानक या कोविड सेंटर मध्ये स्वतः जाऊन ही धक्कादायक परिस्थिती समोर आणली आहे.
जिल्ह्यात बेड अभावी रुग्ण दगावत असताना खंडाळ्यातील ही 54 ऑक्सिजन बेडची सुविधा सुरू असती, तर अनेक रुग्णांना दिलासा मिळाला असता. या सेंटरमध्ये सध्या केवळ लक्षण नसलेले पेशंट दाखल करून घेऊन त्यांच्यावर उपचार करण्याचे काम सुरू आहे. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी गलथान कारभार करणाऱ्या खंडाळा तालुक्यातील प्रांत आणि तहसीलदार यांचे त्वरीत निलंबन करावे, अशी मागणी देखील केली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा