सांगली प्रतिनिधी । तासगावचा मंडलाधिकारी गब्बर सिंग गारळे (वय ३७) याला आठ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. लाच स्वीकारल्यानंतर गारळे यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला अक्षरशः पाठलाग करून पकडले. कुमठे येथील एका तक्रारदाराला केसमध्ये मदत करण्यासाठी गारळे यांनी ही लाच मागितली होती.
याबाबत माहिती अशी, कुमठे येथील एकाची मंडल अधिकारी गारळे यांच्यासमोर एका तक्रारीची सुनावणी सुरू आहे. ‘या सुनावणीत तुम्हाला मदत करतो’, असे सांगून गारळे याने संबंधिताला दहा हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गारळे यांच्याविरोधात तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार आज ‘लाचलुचपत’च्या पथकाने त्याच्याविरोधात सापळा रचला. तक्रारीची शहानिशा करण्यासाठी तक्रारदाराला गारळे यांच्याकडे पाठविण्यात आले. यावेळी गारळे यांनी ‘तुम्हाला केसमध्ये मदत हवी असेल तर मला दहा हजार रुपये द्यावे लागतील’, अशी मागणी केली. मात्र तक्रारदाराने इतक्या पैशांची जुळणी होणार नाही, असे सांगितले. तडजोडीअंती आठ हजार रुपयांचा सौदा ठरला.
या तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर तक्रारदाराला आठ हजार रुपये घेऊन पुन्हा गारळे यांच्याकडे पाठविण्यात आले. यावेळी तासगाव येथील कॉलेज चौकात तक्रारदाराकडून आठ हजार रुपये घेताना गारळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. मात्र आपणावर ‘अँटिकरप्शन’ची कारवाई होतेय, हे लक्षात आल्यानंतर गारळे यांनी कॉलेज वरून थेट भिलवडी नाक्यातील धनगर वाड्याकडे धूम ठोकली. यावेळी एसीबीच्या पथकाने त्याचा थरारक पाठलाग केला. भर रस्त्याने हा थरार सुरू होता. एसीबीचे पथक जवळ आल्यानंतर मंडल अधिकारी गारळे हे रस्त्यावर दुचाकी व पैसे टाकून पळून गेले. पळून जाता – जाता ते रस्त्याकडेच्या हत्ती ग्रासमध्ये घुसले. मात्र पथकाने रस्त्याकडेच्या हत्ती गवत मधून त्यांना पकडले. आठवडाभरापूर्वीच तासगाव तहसील कार्यालयातील पतंग कसबे या उमेदवाराला ‘अँटिकरप्शन’ने लाच घेताना पकडले होते. त्यापूर्वी खंडू निकम यां सेवानिवृत्त लिपीकालाही तहसिल कार्यालयातच लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यामुळे तासगावच्या महसूल विभागाला लाचखोरीची कीड लागली आहे, असेच म्हणावे लागेल.