हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 10 जूनला राज्यसभेसाठी मतदान होणार असून शिवसेना आणि भाजपने आपला सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. प्रत्येक आमदारांचे मत यावेळी महत्त्वपूर्ण असून लहान लहान पक्ष आणि अपक्षांची मते निर्णायक ठरणार आहेत. त्यातच आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींच्या भूमिकेने महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेची कोंडी झाली आहे. महाविकास आघाडीने स्वतः आपणास पाठिंबा मागितला तर आपण त्यावर विचार करू अशी गुगली ओवेसींनी टाकली आहे.
ओवेसी यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हंटल की, महाविकास आघाडीकडून कोणीही माझ्यासोबत किंवा आमच्या आमदारासोबत संपर्क साधलेला नाही. त्यांनी संपर्क केला तर आम्ही विचार करू. जर महाविकास आघाडीला आमची गरज असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. गरज नसेल तर ठीक आहे आम्ही आमचा निर्णय घेऊ. आम्ही आमच्या आमदारांसोबत बोलत आहोत आणि एक किंवा दोन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ,” असे ओवेसी यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्य सभेच्या निवडणूकिला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून सर्वच राजकीय पक्ष आपापल्या आमदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून संजय पवार तर भाजपकडून धनंजय महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी अपक्ष आणि छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यानुसार महाविकास आघाडी आणि भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 एवढे आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामध्ये भाजप 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार त्यांच्या सोबतीला आहेत.