हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल औरंगाबादमध्ये सभा पार पडली. या सभेत त्यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या भूमिकेवर ठाम राहत जाहीर इशारा दिला. राज यांनी काल मांडलेल्या भूमिकेनंतर आज एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी विरोधकांवर निशाणा साधला असून मोठी घोषणा केली आहे. ”भाजपनेच महाराष्ट्रात मुस्लिमांच्या विरोधात द्वेष सुरु केला. भाजपकडूनच आज सर्वात जास्त हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण सुरु आहे. आता राज ठाकरेंप्रमाणे महाराष्ट्रभर घेणार सभा असल्याची घोषणा ओवेसी यांनी केली आहे.
एमआएमच्यावतीने आज नांदेड येथे ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी असदुद्दीन ओवेसींनी विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “राज्यात जे काही चाललंय आम्ही पाहत आहोत. महाराष्ट्रात संविधानाच्या विरोधात बोलले जाते. राजकीय स्पर्धा सुरु आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भावांचे भांडण आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना विचारा, मी द्वेषाचे राजकारण करत नाही,पण ज्या प्रमाणे राज ठाकरे यांनी सभा घेतल्या त्याच प्रमाणे आता आम्हीही औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, परळी यासह महाराष्ट्रभर सभा घेणार आहोत.
राज्यातील भोंग्यांचा मुद्दा म्हणजे मुस्लिम विरोधात एक प्रकारे रचण्यात आलेले षडयंत्रच म्हणावे लागेल. पण आम्ही कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. आम्ही निवडणूकीतून शिवसेनेचा पराभव केला याचे दुःख संजय राऊत यांना जास्त आहे. त्यामुळे ते आम्हाला बी टीम म्हणून आमच्यावर राग काढत आहेत, अशी टीकाही ओवेसी यांनी यावेळी केली.