आषाढी एकादशीला यंदाही पायी वारी नाही, बसमधूनच पंढरपूरला पालख्या जाणार : अजित पवार

पुणे | गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीची पायी वारी काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पंढरपूरला यंदाही बसमधूनच पालखी सोहळा नेण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत. त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांची एक बैठक झाली असून त्यांनी राज्य सरकारला अहवाल दिला आहे. त्यानंतर काल राज्याची कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यात आषाढी वारीसाठी महत्त्वाच्या मानाच्या सर्व दहा पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असं पवार म्हणाले.

रिंगण आणि रथोत्सावाला केवळ 15 वारकऱ्यांना परवानगी राहणार आहे. तसेच वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. देहू आणि आळंदी येथून 100 वारकऱ्यांना परवानगी दिली जाईल. तर 10 बसमधून 20 पालख्या नेण्यात येणार आहेत. या सोहळ्यात कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

You might also like