आशिष देशमुखांची काँग्रेसमधून हकालपट्टी! 6 वर्षांसाठी केलं निलंबित

ashish deshmukh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र काँग्रेस मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसने विदर्भातील माजी आमदार आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसने त्यांना ६ वर्षांसाठी निलंबन केलं आहे. पक्षाची शिस्त मोडल्याचा ठपका ठेवून आशिष देशमुख यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

आशिष देशमुख यांनी यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधातील विधाने केली होती. त्याच पार्श्वभूमीवर ५ एप्रिल रोजी काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने त्यांना एक नोटीस पाठवली होती. यानंतर देशमुख यांनी ९ एप्रिल रोजी उत्तर दिलं. पण हे उत्तर समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांचे याबाबतचे पत्र समोर आलं आहे.

आपण आपल्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल व जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात लागू होतात. आपण केलेल्या पक्षविरोधी वक्तव्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निष्कासन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरुन पुढील सहा वर्षाकरिता तात्काळ निष्कासित करण्यात येत आहे असं सदर पत्रकात म्हंटल आहे.

आशिष देशमुख यांचं काँग्रेसमधून निलंबन झाल्यानंतर आता ते पुढे काय करणार असा प्रश्न निर्माण झालाय. ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची सुद्धा शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी गेले होते. त्यानंतर देशमुख यांना भाजपकडून विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळेल अशा चर्चाही सुरु झाल्या होत्या. पण मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने देशमुख भेटायला आले होते, असं त्यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं होतं.