हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | UPAचं अध्यक्षपदाबाबत देशभरात चर्चा असताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद देण्याची मागणी केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी तशी इच्छा बोलून दाखवली आहे. इतकच नाही तर सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत यांनी UPA अध्यक्षपदावरुन काँग्रेसवर टीकाही केलीय. त्या टीकेला काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय.
शिवसेनेशी आमची आघाडी केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असून, राज्यातील आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर झाली आहे. किमान समान कार्यक्रम प्रमाण मानून काँग्रेसने आघाडीचा महाराष्ट्रापुरता निर्णय घेतलेला आहे. शिवसेना अजूनही यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा सल्ला शिवसेनेने देऊ नये असा इशारा चव्हाण यांनी शिवसेनेला दिला आहे.
केंद्रातील यूपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत संजय राऊत यांचा विधानाचा समाचार घेतला आहे. ‘आम्ही शरद पवार यांचा आदर करतो. ते देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. पवार यांच्याविषयी काही बोलणे मला योग्य वाटत नाही. आपण यूपीएचे नेतृत्व करणार असल्याच्या वृत्ताचा दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच इन्कार केलेला आहे. यूपीएचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केलेले आहे,’ याकडेही अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधले.
संजय राऊत काय म्हणाले?
देशात भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील सरकारांना केंद्र सरकारकडून कोणतंही पाठबळ दिलं जात नाही. भाजपची तानाशाही सुरु आहे. या तानाशाहीविरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यायला हवं”, असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. देशात विरोधी पक्षाची दुर्दशा झाल्याचं म्हणत त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवरही निशाणा साधला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’