हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाराष्ट्राच्या राजकारणाचे समीकरण पालटवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. अखेर आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) बडे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. थोड्या वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला आहे. सोमवारी काँग्रेसवर असलेल्या नाराजीमुळे अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चव्हाण थेट भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे की, “मी कधीही कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही आणि करणार नाही. सभागृहात विरोधी भूमिका मी प्रमाणिकपणे केली. सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांशी सबंध होते ती एक परंपरा आहे. पक्ष जे आदेश देतील ते मला मान्य असतील. जे मला सांगितले जाईल त्यानुसार मी काम करीन. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कुणी जा असे सांगितले नाही. मी अधिक भाष्य करणार नाही, योग्य वेळी बोलीन”
दरम्यान, सोमवारी चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले होते. तसेच आमदारकीचा राजीनामाही विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे सोपवण्याचे सांगितले होते. यामुळे आता लवकर अशोक चव्हाण भाजपची वाट धरतील, ही चर्चा राजकिय वर्तुळात रंगली होती. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम देत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्य म्हणजे, अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे याचा मोठा फायदा आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला होईल असे म्हटले जात आहे.