हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. गेहलोत समर्थक आमदारांच्या बंडखोरीनंतर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतुन अशोक गेहलोत यांचा पत्ता कट होण्याची चर्चा सुरु आहे. एवढंच नव्हे तर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत दिग्विजय सिंह, कमलनाथ, मुकुल वासनिक, केसी वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांसारखे पक्षाचे बडे नेते उतरले आहेत.
अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांनी हायकमांडच्या इच्छे विरोधात जाऊन राजीनामे दिल्याने राजस्थान मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. गहलोत यांच्या या कृत्यामुळे गांधी परिवाराचा अपमान आणि विश्वासाला धक्का बसला आहे. त्यामुळेच काँग्रेस वर्किंग कमिटीने अशोक गेहलोत यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून वगळण्याची शिफारस सोनिया गांधींकडे केली आहे .
राजस्थानमध्ये नेमकं काय घडलं?
अशोक गेहलोत यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी समोर आल्यानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. तत्पूर्वीच तब्बल ८२ गेहलोत समर्थक आमदारांनी राजीनामा देत खळबळ उडवून दिली. या आमदारांचा सचिन पायलट याना विरोध आहे. आमदारांनी राजीनामे नाट्य घडवून आणल्याने काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही नाराज झाले होते. त्यामुळे गेहलोत यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाद होण्याची शक्यता आहे.