कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला. अशा लोकांच्या उदरनिर्वाहासाठी साकुर्डीतील अशोकराज चॅरिटेबल ट्रस्ट व अशोकराज पतसंस्थेने अडचणीच्यावेळी धान्य देऊन गरजूंना मोठा आधार दिला आहे, असे प्रियदर्शनी उद्योग समूहाचे अशोकराव पाटील यांनी नमूद केले.
कोरोना काळात साकुर्डी येथील अशोकराज पतसंस्था, अशोकराज ट्रस्ट व अशोकराज इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने गरजूंना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे संस्थापक शरद चव्हाण, सरपंच अॅड. विश्वासराव निकम, उपसरपंच विश्वासराव कणसे, निवासराव शिंदे, श्रीकांत ढगाले, मसुनाथ रसाळ, जगन्नाथ डोंगरे, नवनाथ पालेकर उपस्थित होते.
शरद चव्हाण म्हणाले, “कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठी पुन्हा सलग दुसऱ्याही वर्षी लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. लॉकडाउनमुळे अनेक मजूर, युवक, महिलांचा रोजगार बुडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक उद्योग-व्यवसाय बंद राहिल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची नाजूक स्थिती आहे. त्याचा विचार करून अशोकराज ट्रस्टच्या माध्यमातून यापूर्वीही मदत केली आहे. यंदाही सामाजिक बांधिलकीतून धान्य किटचे वाटप केले आहे. यापुढेही गरजूंच्या मदतीसाठी ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत राहू.” आप्पासाहेब चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. शुभम चव्हाण यांनी आभार मानले.