औरंगाबाद – शहरातील नेहमी गजबजणाऱ्या सिडको परिसरातील सावजी हॉटेलमध्ये एका तरुणावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या मारहाणीत आनंद ढगे (27, रा. आनंद नगर, चिकलठाणा एमआयडीसी) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
सिडकोतील मुख्य रस्त्यावरील सावजी हॉटेलमध्ये सात ते आठ जणांचे टोळके बसले होते. त्यातील एसटी कॉलनीतील रहिवासी व्हिलन नावाच्या इसमाने त्याचा मित्र आनंद ढगे यास बोलावून घेतले. आनंद ढगे आल्यानंतर काही वेळाने सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्यास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याच्या डोक्यावर बिअरच्या बाटल्या फोडण्यात आल्या ची माहिती जखमीचे मामा रतन गायकवाड यांनी दिली आहे. याशिवाय त्याला बुक्क्यांनी मारून उडवण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर मारेकरी निघून गेले. हॉटेल चालकाने ही आनंद यास बाहेर काढून टाकत हॉटेल बंद केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
घटनेची माहिती नातेवाईकांना समजल्यानंतर आनंद याला एमजीएम रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला व्हेंटिलेटर लावून खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असून मध्यरात्रीपर्यंत तो बेशुद्ध अवस्थेत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.