घातपात की आत्महत्या? : पाटणला महिलेसह पुरूषाची एकाच झाडाला गळफास घेवून आत्महत्या

पाटण | म्हारवंड (ता. पाटण) येथे 36 वर्षीय विवाहित महिला आणि 40 वर्षीय विवाहित पुरुषाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. शोभा गुलाब पवार आणि प्रकाश भिकू निकम अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. बुधवारी (दि. 23) रात्री ही घटना उघडकीस आली. या घटनेची फिर्याद मृत महिलेची आई आणि मृत पुरुषाचा भाऊ यांनी पाटण पोलिसांत दिली आहे. या घटनेच्या चाैकशीची मागणी फिर्यादी सावळा भिकू निकम यांनी केली आहे. या घटनेबाबात अनेक तर्कविर्तक लढविले जात असून पोलिस कसून तपास करीत आहेत.

याबाबत मृत शोभा पवार हिची आई कालाबाई यशवंत चव्हाण (रा. बामणेवाडी ता. पाटण) यांनी पाटण पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, शोभा गुलाब पवार (वय- 36) हिचा विवाह गुलाब पवार (रा. म्हारवंड ता. पाटण) यांच्याशी झाला होता. तिचे पती मयत झाल्यानंतर शोभा ही मुंबई येथे नोकरी करत होती. शोभा ही मुंबईहून रविवार दि. 20 मार्च रोजी बामणेवाडी येथे आमच्याकडे आली होती. त्यानंतर ती मंगळवार दि. 22 रोजी पाटण येथे कामानिमित्त जाते असे सांगून म्हारवंड येथे आली होती. दि. 22 रोजी शोभा दिवसभर घरी बामणेवाडी येथे आली नसल्यामुळे आम्ही दि. 23 रोजी रात्री 11 वाजता तिला शोधण्यासाठी तिच्या सासरी म्हारवंड येथे गेलो होतो. तेव्हा ती तेथे नव्हती.

त्यानंतर आम्ही प्रकाश निकम यांच्या घरी जाऊन येथे शोभा आली आहे का असे विचारले असता, प्रकाश निकम यांच्या पत्नीने सांगितले की ते दोघे फोन लावण्यासाठी धावडमळीकडे गेले आहेत. आम्ही सर्वजण रात्री 12. 30 या सुमारास धावडमळीकडे गेलो असता एका शेतातील आंब्याच्या फांदीला दोघांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेची नोंद पाटण पोलिसांत झाली असून अधिक तपास पो.नि एन. आर. चौखंडे करत आहेत.