कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील उंडाळे, शेवाळेवाडी-म्हासोली येथील अथणी शुगर्स – रयत साखर कारखान्याने सन 2021-22 या गळीत हंगामात यंदा विक्रमी गाळप करण्यात आले. सुमारे 160 दिवसात पहिल्यांदाच उच्चाकी असे 5 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा कारखान्याने ओलांडला. या निमित्ताने रयत कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांचे हस्ते युनिट हेड रवींद्र देशमुख, शेती अधिकारी विनोद पाटील यासह अधिकाऱ्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उदयसिंह पाटील म्हणाले, “‘अथणी रयत’च्या भागीदारीस यशस्वी अशी सात वर्षे पूर्ण होत आहेत. सात वर्षे पूर्वी कारखाना विक्री करावा लागतो की काय अशी अवस्था होती. मात्र, त्या अडचणीतून स्व. काका व अथणी चेअरमन आमदार श्रीमंत पाटील तात्या यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालत आज रयत कारखाना पूर्णपणे कर्ज मुक्त होऊन स्पर्धात्मक ऊस भाव देत सक्षम बनला आहे. काकांनी कारखानदारी उभी करताना शेतीच्या पाण्याचे नियोजन केले. यावर्षी कारखान्याचे 5 लाख मे टन गळीत पूर्ण केले. यामध्ये कार्यक्षेत्रातील ऊसाचे प्रमाण 80 टक्के इतके आहे. यापुढील काळात कारखान्याची विस्तारवाढ करून कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
अथणी शुगर्स – रयत साखर कारखान्याने दि. 15 मार्च पर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचेही 2 हजार 925 प्रमाणे पैसे ऊस उत्पादक कारखान्याचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याने शेतकरी वर्गातून अथणी रयत व्यवस्थापनाचे अभिनंदन होत आहे. डोंगरी विभागात कारखानदारी आणून हा भाग सुजलाम सुफलाम बनवताना रयत कारखान्याने 5 लाख मे टन पेक्षा जास्त ऊस गाळप व शेजारील कारखान्याच्या बरोबरीने उसाला दर द्यावा, अशी अपेक्षा संस्थापक स्व. विलासराव काकांची होती. गेली सहा गळीत हंगामात अथणी रयत ने एक एक टप्पा गाठत यावर्षी 5 लाख टन गळीत पार करत काकांची ही यानिमित्ताने स्वप्नपूर्ती केली.