औरंगाबाद – महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राज्यातील दलितांवर अत्याचार वाढल्याची खंत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (पीरिपा) संस्थापक अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी येथे सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पीरिपा सत्तेत सहभागी असला तरी दोन वर्षांपासून सत्तेचा वाटा न मिळाल्याने कवाडे यांनी नाराजीही व्यक्त केली. यावेळी कवाडे यांनी महाविकास आघाडीतील सत्तेत असलेले लोकप्रतिनिधींवर आरोप केले.
यावेळी बोलताना कवाडे म्हणाले, ‘‘बुलडाणा, जालना येथील दलितांवर झालेल्या अत्याचाराविरोधात पीडितांच्या हक्कासाठी उभे राहण्या ऐवजी येथील लोकप्रतिनिधी आरोपीला मदत करत असल्याचे समोर आले आहे; तसेच महाड येथील पूरग्रस्त भागाचा दौरा करताना एका गावात दलित समाजातील नागरिकांवर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचा नकार देण्यात आला, या विरोधात पोलिस पाटलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे; तसेच बीडमध्ये दलितांवर रोज अत्याचार होत आहे’’, असेही ते म्हणाले.
अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासन दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केले. पक्षाच्या वतीने आता या विरोधात समाजाला आधार व पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात रिपब्लिकन गार्ड तयार करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, सत्तेत सहभागी असले तरी अद्याप सत्तेचा वाटा मिळालेला नाही. यामुळे सत्तेत पाच टक्के वाटा द्यावा, अशा मागण्याचे पत्र काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात आले आहे. दरम्यान, यासंदर्भात लवकर निर्णय न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकांवर याचा परिणाम दिसून येईल असेही ते म्हणाले.