हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. केजरीवाल यांच्या घरावर केलेल्या हल्ल्यात हल्लेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेक्युरिटी बॅरिअर तोडले आहेत. तसेच घराच्या गेटवरील बूम बॅरिअरही तोडले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
सिसोदिया यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहे की, भाजपच्या गुंडांनी केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली आहे. भाजपच्या पोलिसांनी या गुंडांना रोखण्याऐवजी केजरीवालांच्या घरापर्यंत त्यांना घेऊन गेली. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.
बीजेपी के गुंडे CM @ArvindKejriwal जी के घर पर तोड़फोड़ करते रहे. बीजेपी की पुलिस उन्हें रोकने की जगह उन्हें घर के दरवाज़े तक लेकर आई. https://t.co/oSFc2kWaDC
— Manish Sisodia (@msisodia) March 30, 2022
केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर आपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. केजरीवाल सरकारमधील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. हे पहिल्यांदाच होत नाही. हा लोकशाहीला धोका आहे. दिल्ली पोलीस आणि गृहमंत्रालयाने त्याविरोधात कारवाई केली पाहिजे, अशी मागणी राय यांनी केली आहे.