औरंगाबाद – अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या अंगावर टिप्पर वाहन आणि बुलडोजर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न वाळूमाफियांनी केला. यात जिवाच्या आकांताने पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला हा थरार गुरुवारी पहाटे शिवना नदी पात्रात घडला. यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
वैजापूर तालुक्यातील लाखणी शिवारातील शिवना नदी पात्रातून वाळूची अवैध चोरी होत असल्याची माहिती तहसीलदार गायकवाड यांना मिळाली होती. त्या आधारे गायकवाड हे त्यांचे सुरक्षारक्षक चालकाला सोबत घेऊन शासकीय वाहनाने गुरुवारी पहाटे घटनास्थळी गेले. सुरुवातीला त्यांनी हडस पिंपळगाव, जळगाव, शहाजपुर शिवारात काही वाहनांवर कारवाई केली. त्यानंतर लाखणी शिवारात शिवना नदी पात्रात गेल्यानंतर तेथे एका विना क्रमांकाच्या टिप्पर मध्ये बुलडोजरच्या सहाय्याने वाळू भरण्यात येत होती. वाहनातून उतरून तहसीलदारांनी त्यांना हटकल्यानंतर मुळे नामक व्यक्तीच्या इशार्यावरून टिप्पर चालकाने थेट तहसीलदारांच्या अंगावर वाहन घातल्याचा प्रकार पुढे आला. मात्र, तात्काळ बाजूला झाल्याने त्यांचा जीव वाचला. पाठीमागून बुलडोजर चालकाने ही पाठलाग करून बुलडोजरची सोंड जोरजोराने फिरवून तहसीलदारांना चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथून पायी पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला.
यावेळी तहसीलदारांच्या सुरक्षारक्षकाने गोळीबार केल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्यांनी ती अफवा असल्याचे सांगितले. या प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणि वाळूचोरी आदी विविध कलमान्वये मुळे व अन्य अनोळखी व्यक्तींविरुद्ध शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.