रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Rohit Pawar Pune Office
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट एकमेकांवर टीकाटिप्पणी करत असतानाच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न काही अज्ञातांनी केला आहे. याबाबतच सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून यासंदर्भात हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, हडपसर परिसरात आमदार रोहित पवार यांचं सृजन हाऊस या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय आहे. त्यांच्या या कार्यालयात शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करत जाळपोळ केली. यादरम्यान, पार्किंग मध्ये असलेली एक सायकल आणि कार्यालयाची काही प्रमाणात जाळपोळ देखील झाली. सायकलला ऑइल पेंटच्या साह्याने आग लावण्यात आल्याचे समोर आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे.

सीसीटीव्ही कॅमेरात ३ व्यक्ती येताना दिसत आहेत. या व्यक्ती नेमक्या कोण आहेत ? आणि रोहित पवारांचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न नेमका कशासाठी झाला? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या धक्कादायक घटनेनंतर हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.