कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कृष्णा कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदा यंदा डिस्टलरीला ३० कोटी ७५ लाखांचा उच्चांकी नफा झाला आहे. पण कारखान्याचे माजी चेअरमन मात्र डिस्टलरीवरून बिनबुडाचे आरोप करून, सभासदांची दिशाभूल करीत आहेत. खिशातील चिठ्ठी वाचल्याशिवाय ते भाषणात बोलत नाहीत. अशी टीका कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी अविनाश मोहिते यांच्यावर नाव न घेता केली. कार्वे (ता. कराड) येथे य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना सभासदांच्या बैठकीत ते बोलत होते.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, की आपल्या कारखान्याचे कार्यक्षेत्र मोठे आहे. सर्वांचा ऊस वेळेत जावा या उद्देशाने चेअरमन डॉ. सुरेशबाबा यांनी कारखान्याची गाळप क्षमता वाढवली आहे. यापूर्वीदेखील सुरेशबाबांनीच गाळप क्षमता वाढवली होती. भविष्यात १२००० मे. टन क्षमता करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. कारखान्याने बचतीचे धोरण राबविले आहे. संचालक मंडळ भत्ता, गाडी, डिझेल घेत नाही. गेस्ट हाऊस बंद केले. गेल्या २५ वर्षात कधीही कारखान्यास पुरस्कार मिळाला नाही. मात्र यावेळी आमच्या काळात कारखान्याला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार मिळाला.
मागील संचालक मंडळाने पैशाची उधळपट्टी केली. त्यांच्या काळात साखर उतारा कमी, दर कमी, चढ्या दराने माल खरेदी करून कारखाना तोट्यात घालवला. याचा परिणाम त्यांना अडीच हजाराच्यावर दर देता आला नाही. मात्र स्वत:च्या काळातील गैरकारभार लपविण्यासाठी माजी चेअरमन डिस्टलरीच्या मुद्द्यावरून सभासदांची दिशाभूल करत आहेत. वास्तविक डिस्टलरीचा उच्चांकी नफा डॉ. सुरेशबाबांच्या चेअरमनपदाच्या काळातच प्राप्त झाला आहे. याउलट माजी चेअरमनच्या काळात मात्र डिस्टलरी बंद करा, अशी नोटीस मिळाली होती. सभासदांनी या वस्तुस्थितीकडे पाहावे आणि मागील व आत्ताच्या कारभाराचा तुलनात्मक विचार करावा, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक निवासराव थोरात, धोंडिराम जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला सरपंच संदीप भांबुरे, उपसरपंच प्रवीण पाटील, माजी उपसरपंच वैभव थोरात, इरिगेशनचे अध्यक्ष निवास थोरात, कैलास जाधव, सुभाष थोरात, जालिंदर शिंदे, अशोक थोरात, हिंदुराव थोरात, शिवाजी थोरात यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा