लोहारवाडी ग्रामपंचायतीवर डॉ. अतुल भोसले गटाचे वर्चस्व
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
लोहारवाडी (ता. कराड) येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. डॉ.अतुल भोसले यांचे समर्थक असणार्या जोतिर्लिंग विकास पॅनेलने सरपंच पदासह ५ जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले. विरोधी गटाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागल्याने, या निकालामुळे लोहारवाडी ग्रामपंचायतीत गेली २५ वर्षे सत्तेवर असलेल्या उंडाळकर गटाला सुरूंग लागला आहे.
कराड तालुक्याच्या सीमेवर असणार्या लोहारवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. ना. डॉ. अतुल भोसले समर्थक पैलवान सचिन बागट व सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखालील जोतिर्लिंग विकास पॅनेल आणि उंडाळकर गट समर्थक नरसिंह वाघजाई पॅनेलमध्ये झालेल्या निवडणुकीत मतदानापूर्वीच भोसले समर्थक गटाचे रामचंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली.
त्यानंतर रविवारी (ता. 24) सरपंचपद व अन्य 4जागांसाठी मतदानप्रक्रिया पार पडली. यामध्ये भोसले समर्थक पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार आप्पासो बाबुराव आवळे यांच्यासह बाबासाहेब तानाजी मुंद्राळकर, बाळाबाई खाशाबा जाधव आणि कलाबाई सुरेश मुंद्राळकर यांनी घवघवीत मताधिक्य मिळवून विजय संपादन केला. तर विरोधी गटाच्या सविता पांडुरंग बागट या विजयी झाल्याने, त्यांना केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले.
निकाल घोषित झाल्यानंतर विजयी जोतिर्लिंग विकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयोत्सव साजरा केला. तसेच कृष्णा हॉस्पिटल येथे येऊन सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले.याप्रसंगी पैलवान सचिन बागट, सुरेश पवार,जनार्दन जाधव, कलु जाधव, अधिक सावंत,आकाराम भोसले, शंकर कदम, शंकर जाधव,आप्पासो जाधव, अरूण पवार, किरण सावंत,पिलाजी पवार, कोयना वसाहतीचे सरपंच राजेंद्र पाटील आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.