हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ऋतुराज गायकवाड यांची भारतीय क्रिकेट संघात झालेली निवड ही आम्हा सांगवीकरांसाठी अतिशय भूषणावह बाब आहे,असे मत पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अतुल नानासाहेब शितोळे यांनी व्यक्त केले. कोलकाता येथे होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आणि टी – २० सामन्यात भारतीय संघाकडून खेळणाऱ्या क्रिकेटपटुंची नावे निवड समितीकडून नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत.त्या नावात ऋतुराज गायकवाड यांचे देखील नाव आहे.
चोवीस वर्षीय ऋतुराज दशरथ गायकवाड हे मूळचे पुण्याचे आहेत. पिंपरी – चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील जुनी सांगवी या भागात त्यांचे वास्तव्य आहे. आयपीएल सामन्यात ऋतुराज हे चेन्नई सुपर किंग या संघाकडून खेळतात.ऋतुराज यांची भारतीय संघात निवड झाल्याचं कळताच अतुल शितोळे “हॅलो महाराष्ट्र” सोबत संवाद साधला आणि आपल्या मनातील आनंद व्यक्त केला.
अतुल शितोळे बोलतांना म्हणाले की ” २०१५ साली मी पिंपरी – चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती सभापती असताना थेरगाव येथील “वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमी” येथे वेंगसरकर सरांच्या निमंत्रणाला मान देऊन बक्षिस वितरण कार्यक्रमाला गेलो होतो.त्यावेळी ऋतुराज आणि त्याच्या टीमला माझ्या हस्ते पारितोषिक सुद्धा देण्यात आले होते.त्याकार्यक्रमप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना मी वेंगसरकर सरांना म्हटलं होतं की “सर मी गाव पातळीवर क्रिकेट खेळलो त्यातून अनेक छोटे – मोठे अनुभव घेत गेलो. त्याच मैदानावरच्या अनुभवामुळे मला राजकारणाचे चढ – उतार पचवायची सवय लागली.याच मैदानाच्या अनुभवामुळे कुठ्ल्याही कामात स्वतःला गुंतवून घ्यायची,एकाग्र होण्याची सवय लागली.त्यातून मी आज जे काही आहे ते घडलो.सोबतच मी ऋतुराजला देखील उद्देशून म्हणालो होतो की “ऋतुराज आम्हाला कधी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळता आले नाही.पण भावी काळात तू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळावसं अशी आमची इच्छा आहे.
आज ऋतुराजने आमची ती इच्छा पूर्ण केली आहे.यामागे निश्चितच त्याने घेतलेली प्रचंड मेहनत आहे. त्याच्या आई – वडिलांचे आशीर्वाद देखील आहेतच.पण २०१५ साली मी व्यक्त केलेली अपेक्षा पूर्ण करत त्याने आज आमच्या सांगवी गावाची मान उंचावली आहे.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तसेच या निमित्ताने एक आठवण ताजी झाली आणि आमची एक अनोखी स्वप्नपूर्ती झाली,असेही शितोळे यांनी म्हटले आहे.एकंदरीतच ऋतुराज गायकवाड यांची भारतीय संघात निवड झाल्याचं कळताच सगळीकडून आनंद व्यक्त केला जातोय.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.