औरंगाबाद – शहरातील महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर अनेक दिवसांपासून रखडलेली काँग्रेसची कार्यकारिणीही जाहीर झाली. प्रदेश काँग्रेस कमिटीने शहर काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी घोषित केली असून यात तब्बल दीडशे जणांची वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मराठवाड्यात काँग्रेसच्या सदस्य नोंदणीला अत्यंत थंड प्रतिसाद असल्याचे उघडकीस आले होते. याबद्दल वरिष्ठांनी नाराजीही व्यक्त केली होती. मात्र महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने तातडीने कार्याकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
औरंगाबादच्या शहराध्यक्ष पदी हिशाम उस्मानी यांची निवड झाल्यानंतर शहर कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली नव्हती. कार्यकारिणीत स्थान मिळावे, यासाठी अनेकजण प्रयत्नात होते. तर शासकीय कमिट्यांवर निवड व्हावी, यासाठी अनेक पदाधिकारी मुंबईवारीही करून आले होते. त्यातच येत्या काही महिन्यात महानगरपालिका निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शहर कार्यकारिणीची नव्याने बांधणी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मंजुरीनंतर प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी 4 मार्च 2022 रोजी शहर कार्यकारिणी जाहीर केली. यात 20 उपाध्यक्ष, 44 सरचिटणीस, 43 सचिव, 1कोषाध्यक्ष, 2 प्रवक्ते, 40 सदस्य आणि सर्व वरिष्ठ नेत्यांना कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. 2019 चे लोकसभा आणि विधानसभा उमेदवार, आघाडी संघटनांचे अध्यश्र प्रदेश पदाधिकारी हे निमंत्रित सदस्य आहेत.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वातील ग्रामीणची कार्यकारिणी अद्याप जाहीर झालेली नाही. शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांच्या दोन महिने आधीच प्रदेशाध्यक्षांकडे काळे यांची यादी पोहोचली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी ही यादीही लवकरात लवकर येणे अपेक्षित आहे.