लसीकरणात औरंगाबाद जिल्ह्याची ‘झेप’; मराठवाड्यात अव्वल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – लस घेतली नसेल तर पेट्रोल, राशन मिळणार नाही, तसेच प्रवासही करता येणार नाही, असा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश निघताच ग्रामीण भागात रांगा लावून नागरिकांनी लस घेण्यास सुरुवात केली. मागील महिन्यात लसीकरणात मागे असलेला औरंगाबाद जिल्हा सध्या मराठवाड्यात पहिल्या स्थानावर आहे, तर राज्यातही औरंगाबाद जिल्ह्याने 16 व्या स्थानी झेप घेतली आहे. रविवार पर्यंत जिल्ह्यातील 78 टक्के नागरिकांनी पहिला, तर 31 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. शहरात एका महिन्यात तब्बल चार लाख नागरिकांनी लस घेतली.

ऑक्‍टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात औरंगाबाद जिल्ह्यात केवळ 46 टक्के नागरिकांनी लस घेतली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी 9 तालुक्यात नोडल अधिकारी नेमले आणि लसीकरणासाठी तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी यांची मदत घेतली‌‌. यामुळे यंत्रणा झाडून कामाला लागली आणि जिल्ह्यातील 16 लाख 86 हजार नागरिकांना पहिला डोस देत 78 टक्के उद्दिष्ट गाठले गेले.

शहरात एका महिन्यात 4 लाख नागरिकांना लस –
लस न घेतल्यास शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही, शासकीय कार्यालयात प्रवेश मिळणार नाही, पेट्रोल, राशन मिळणार नाही अशा प्रकारचे आदेश निघताच शहरातही नागरिकांनी लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. गेल्या महिन्याभरात शहरात 4 लाख 3 हजार 625 नागरिकांची लसीकरण झाल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे.

Leave a Comment