मुंबई प्रतिनिधी |सत्ता भोगत शिवसेनेने भाजपला नको त्या शिव्या दिल्या. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपशी युती केली खरी पण हळूवारपणे भाजपकडू शिवसेनेच्या सगळ्या आशा निराशेतच परिवर्तीत केल्या जात आहेत. केंद्रिय मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिवसेनेच्या वाट्य़ाला आलेलं मंत्रीपद, ते आता मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये आतल्या आत होणारी रस्सीखेच ही राज्यातील जनतेला उघड डोऴ्यांनी दिसत आहेच शिवाय आता शिवसेनेच्या वाट्य़ाला पुन्हा एक निराशाच येणार असे चित्र निर्माण झाले आहे.
लोकसभेत शिवसेनेने औरंगाबादची खासदारकी गमावलीच आता तिथलं पालकमंत्रीपदही गमावणार असे दिसते. औरंगाबाद शहराचे आमदार अतुल सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्याकडे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात यावं, अशी मागणी आता स्थानिक भाजपकडून करण्यात आली आहे. सध्या शिवसेनेकडे हे पालकमंत्रीपद असून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादचे पालकमंत्री आहेत.
सुरुवातीला औरंगाबादचं पालकमंत्रीपद पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे देण्यात आलं होतं. पण तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासोबत त्यांचे अंतर्गत वाद असल्याचं समोर आलं. त्यामुळे कदमांना तेथून काढले. यानंतर तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचं पालकत्व देण्यात आलं, पण त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांना देण्यात आली.
अतुल सावे हे शहरातील आमदार आहेत. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे पालकमंत्रीपद भाजपला मिळावं, अशी मागणी स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली आहे. यावर शिवसेनेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.