औरंगाबाद : शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महापालिका प्रशासक यांच्या टास्क फोर्सची बैठक होऊन येत्या काही तासांत लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. २९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार असून, त्यातून उद्योगांना वगळले जाणार आहे.
मार्च महिन्यात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासन हादरुन गेले आहे. दहा-बारा दिवसांपासून शहर व जिल्ह्यात मिळून एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागांतदेखील कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत सापडले आहे.
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गेल्या आठवड्यात ‘व्हीसी’च्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली व त्यांना करोना नियंत्रणाच्याबाबत सूचना केल्या. त्यानंतरही कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत नाही, असे लक्षात आल्यावर देसाई गुरुवारी औरंगाबादेत आले होते. त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले होते.
पालकमंत्र्यांनी दिलेल्या संकेतानंतर प्रशासन शहर व जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात गुंतले आहे. पहिल्या टप्प्यात किती दिवसांसाठी लॉकडाउन लावायचा याचा अंदाज घेतला जात आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सची बैठक होणार असून, या बैठकीत लॉकडाउनचा निर्णय जाहीर केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली. अगोदर जाहीर केल्याप्रमाणे शनिवार-रविवार हे दोन दिवस संपूर्ण लॉकडाउन आहेत. सोमवार २९ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय टास्क फोर्सच्या बैठकीत होऊ शकतो. लॉकडाऊनमधून उद्योग क्षेत्राला वगळले जाणार असल्याची शक्यता आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group