औरंगाबादकरांना मिळणार थेट पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाचा गॅस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा ते औरंगाबाद सीएनजी गॅस पाईपलाईन टाकण्याचा भूमिपूजन समारंभ 2 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. कराड म्हणाले, आपल्या शहरातील सुमारे दोन लाख कुटुंबांना पाइपलाइनद्वारे गॅसचा पुरवठा केला जाईल. सोबतच वाळूज, शेंद्रा एमआयडीसीतील उद्योगांनाही या गॅस पाईपलाईनचा लाभ होईल. यासाठी महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. या समारंभाला पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, प्रशांत बंब, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, सतीश चव्हाण, विक्रम काळे यांची उपस्थिती असेल असेही त्यांनी सांगितले.

1555 किमीचे जाळे –
श्रीगोंदा ते औरंगाबाद 218 किमी लांबीची पाइपलाइन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातील अंतर्गत मुख्य रस्त्यावरील 66 किलोमीटर तर गल्ली गोळा पर्यंत 1555 किलोमीटरचे पाईपलाईन जाळे दोन वर्षात टाकले जाईल. यासाठी केंद्र सरकार चार हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. ही पाईपलाईन टाकण्याचे काम भारत पेट्रोलियम कंपनी करणार असल्याचे डॉ. कराड यांनी नमूद केले.

Leave a Comment