औरंगाबाद – दहावीत शिकणाऱ्या एका 15 वर्षीय विद्यार्थीनीवर जोगेश्वरी येथील एका नराधमाने जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडलेली ही घटना सोमवारी उघडकीस आली.
वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे दहावीच्या वर्गात शिकणारी पंधरा वर्षीय विद्यार्थिनी आई-वडील व बहिणीसह राहते. आई कंपनीत तर वडील दुकानावर असतात. कोरोनामुळे लागलेल्या लाॅकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने ऑनलाईन वर्ग होते. त्यासाठी पीडित मुलगी आईचा मोबाइल वापरत होती. त्यावेळी तिला फोनवर सतत कॉल येत असल्याने तिच्या वडिलांनी आरोपी आकाश सत्तावन याला घरी बोलावून समज दिली होती. त्यावेळी पीडित मुलीने त्याला पाहिलेले होते. रविवारी (ता.१९) दुपारी दोन वाजेच्या सुमारास पीडित मुलीची आई कंपनीत गेली होती, तर तिचे वडील जेवण करून दुकानावर गेले होते. दरम्यान तिची बहीण कपडे वाळत घालण्यासाठी गच्चीवर गेली असता जोगेश्वरी येथील आकाश सत्तावन या नराधमाने तिच्या घरात घुसून तिचे तोंड दाबून घराच्या खाली बांधकाम सुरू असलेल्या खोलीत नेले. तेथे त्याने तिच्यावर बळजबरी करून लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान पीडित मुलीने शेजारीच पडलेली वाळू त्याच्या तोंडावर मारल्याने तो बाजूला झाला. ही संधी पाहून तिने त्याच्या तावडीतून सुटका करून घर गाठले. हा प्रकार तिने तिच्या बहिणीला सांगून अत्याचार करणारा आरोपी दाखवला. रात्री हा प्रकार दोघींनी आई-वडिलांना सांगितला.मात्र पीडित मुलगी घाबरलेली असल्याने आईवडिलांनी तिला धीर दिला. सोमवारी आई-वडिलांचा पीडित मुलीने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी आकाश सत्तावन (रा.जोगेश्वरी) याच्याविरुद्ध फिर्याद दिली.