औरंगजेब हा आपला शत्रूच, त्याचे उदात्तीकरण होऊच शकत नाही; हसन मुश्रीफांचे परखड मत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि बहुजनांच्या स्वराज्याचा शत्रू होता. जो शिवरायांचा शत्रू तो हिंदुस्थानातील मुस्लिमांचा सुद्धा शत्रूच आहे. त्यामुळे औरंगजेब (Aurangzeb) हा आपला शत्रू असून त्याचे उदात्तीकरण कधीच होऊ शकत नाही असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे कागल मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मांडले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

हसन मुश्रीफ म्हणाले, शिवरायांना मुस्लिम समाजाबद्दल कधीच आकस नव्हता आणि मुस्लिम समाजाची सुद्धा शिवरायांवर गाढ श्रद्धा होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, सैनिक आणि नोकर- चाकरही होते. महाराजांच्या सैन्यदलात २२ प्रमुख मुस्लिम होते. यावरून सैन्यदलात मुस्लिम मावळे किती असतील, याचीही प्रचिती येते. महाराजांच्या सैन्यदलाचा प्रमुख दौलतखान, महाराजांना जीवाला जीव देणारा आणि त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावणारा त्यांचा अत्यंत विश्वासू व खास अंगरक्षक मदारी मेहत्तर हे मुस्लिमच होते.

75 वर्षांपूर्वी हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशी फाळणी झाल्यानंतर भारतमाता हीच आमची आई आहे या मातृत्वाच्या भावनेतूनच हिंदुस्तानी मुस्लिम समाज या मातीत राहीला. सामाजिक विद्वेषातून दंगे-धोपे आणि दंगली घडविणे हा काही लोकांचा अजेंडाच आहे. या अजेंड्याला बळी पडू नका. मुस्लिम समाजाने आपल्या लहान, अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवून त्यांच्या हातून अशा गोष्टी घडणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.