आजपासून औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद; पुरातत्व विभागाचा निर्णय

औरंगाबाद – खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वादविवाद सुरू आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून औरंगजेबाची कबर पर्यटक व इतर लोकांसाठी पाहण्यासाठी बंद करण्यात आली आहे. या बाबतचा आदेश भारतीय पुरातत्त्व विभागाने काल दुपारनंतर काढला आहे.

काही दिवसांपूर्वी एमआयएमचे वरिष्ठ नेते तेलंगणाचे आ. अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर जावून पुष्प अर्पण करून नतमस्तक झाल्याने देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. यावरून राजकारण सुरू झाले असून वादविवाद वाढत आहेत. दरम्यान, एका राजकीय पक्षाने औरंगजेबाची कबर तोडण्याची धमकी दिल्याने खुलताबादेत मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलीस प्रशासन दर्गा कमिटीच्या पदाधिका-यांनी शेकडो तरूणांची समजूत घालून वातावरण शांत केले होते. पोलीस प्रशासनाने मंगळवारपासून खुलताबाद येथील औरंगजेब कबर व दर्गा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. तसेच कबर परिसरात सशस्त्र पहारेकरी नेमण्यात आले होते.

तसेच बुधवारी ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी औरंगजेब कबर परिसराची पाहणी करून सुरक्षेसंबधी आढावा घेतला होता. बुधवारी दुपारनंतर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या औरंगजेबाची कबर सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रारंभी पाच दिवस कबर पाहण्यासाठी बंद राहील. त्यानंतर वातावरण बघून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पुरातत्त्व विभागाचे राजेश वाकलेकर यांनी लोकमतशी बोलतांनी दिली. भारतीय पुरातत्त्व विभागाने काढलेल्या आदेशाच्या प्रती खुलताबाद पोलीस स्टेशन व इतर विभागास देण्यात आल्या आहेत.