मुंबई । मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातील ७२ कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुरुंगातील एका स्वयंपाकीच्या माध्यमातून एकाच बॅरेकमधील या ७२ कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व कोरोनाबाधित कैद्यांना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तुरुंगाबाहेर क्वारंटाइन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
तुरुंगात असलेल्या कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लॉकडाउनच्या काळात ८ तुरुंगामध्ये लॉकडाउनची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. अशा तुरुंगामध्ये या काळात कुणालाही आत-बाहेर जाण्याची मुभा देण्यात आली नव्हती. तरी देखील एका स्वयंपाकीला झालेल्या कोरोना संसर्गामुळे आर्थर रोडमधील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे देशमुख यांनी सांगितले.
राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या तुरूंगामध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांची संख्या असल्याने सुनावणी दरम्यान (अंडरट्रायल)च्या स्थितीत असलेल्या सुमारे साडे ५ हजार कैद्यांना यापूर्वीच जामिनावर सोडून देण्यात आले आहे. सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी नसलेल्या इतर सुमारे साडे 5 हजार कैद्यांना पॅरोलवर सोडून देण्याचे राज्य सरकारने निर्णय घेतला असून या निर्णयामुळे राज्यातील विविध तुरुंगातील 11 हजार कैदी संख्या कमी होईल असे गृहमंत्री पुढे म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”