सातारा | महाबळेश्वर वनविभागाने धाडसी कारवाई करीत येथील मध्य रेल्वेच्या हाॅलिडे होमला टाळे ठोकले. मध्य रेल्वेच्या ताब्यात असलेली वन विभागाची 5 एकर मिळकत आपल्या ताब्यात घेतली होती. वारंवार नोटीस पाठवुन देखील मध्य रेल्वेने वन विभागाच्या भाडे पट्ट्याचे नुतनीकरण केले नाही. त्या मुळे त्यांच्याकडे थकलेल्या लाखो रूपयांच्या वसुलीसाठी अखेर वन विभागास ही कारवाई करावी लागली अशी माहीती वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.
वेण्णालेकच्या मागील बाजुस क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यावर फाॅरेस्ट सर्व्हे नंबर 223 मधील 5 एकर जागा 1978 साली मध्य रेल्वेला वनविभागाने पुढील 10 वर्षांसाठी भाडेपट्टा कराराने दिली होती. या जागेत मध्य रेल्वेने आपले हाॅलिडे होम बांधले. वन विभाग व मध्य रेल्वे यांच्यात झालेला करार हा 1988 साली संपुष्ठात आला. त्यानंतर मध्य रेल्वेने आपल्या कराराचे नुतनीकरण करणे आवश्यक होते. परंतु त्यांनी ते केले नाही म्हणुन 1998 साली वन विभागाने ही मिळकत कारवाई करून आपल्या ताब्यात घेतली.
त्यानंतर रेल्वेने आपला करार वाढवुन घेतला व वन विभागाने पुन्हा पाच एकर जागा ही मध्य रेल्वेकडे हस्तांतर केली. त्यावेळी केलेल्या कराराची मुदत संपुष्ठात आली. मुदत संपुष्ठात येताच वन विभागाने नोटीसा पाठवुन आपला करार संपला आहे. तो वेळीच नतुनीकरण करून घ्या असे बजावले परंतु मध्य रेल्वेने वन विभागाने दिलेल्या सुचनेकडे दुर्लक्ष केले.
वन क्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी गेली काही महीने या संदर्भात मध्य रेल्वे बरोबर पुन्हा पत्रव्यवहार सुरू केला. आपला भाडे पट्टा करार संपल्याचे मध्ये रेल्वेच्या निदर्शनास आले. काही दिवसांपुर्वी पुन्हा स्मरण पत्र पाठवुन मध्ये रेल्वेला कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. परंतु तरी देखील मध्ये रेल्वेने दुर्लक्ष केले.
अखेर सातारा उप वनसंरक्षक महादेव मोहीते यांनी केलेल्या सुचनेनुसार सहा. वनसंरक्षक सुधीर सोनावले यांनी मध्य रेल्वेवर कारवाई करण्याचे आदेश दिले. वरीष्ठांनी दिलेल्या आदेशा नुसार येथील वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी विशेष पथकासह आज सकाळी कारवाई साठी रेल्वे हाॅलिडे होमवर पोहोचले तेथे जे रेल्वे कर्मचारी होते त्यांना त्यांचे सामान घेवुन बाहेर काढले व सर्व हाॅलिडे होम ताब्यात घेतले. हाॅलिडे होमच्या मुख्य प्रवेश व्दारावर कुलूप लावुन ही पाच एकरची मिळकत सील केली. या वेळी वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांचे बरोबर वनपाल सहदेव भिसे, वनरक्षक लहु राउत, रमेश गडदे, अभिनंदन सावंत आदी उपस्थित होते.
भाडेपट्टा कराराचे नुतनीकरण करा अन्यथा सील ठोकणार : श्रीकांत कुलकर्णी
मध्य रेल्वे प्रमाणेच महाबळेश्वर शहरात परीसरात वन विभागाने भाडेपट्ट्याने दिलेल्या एकुन 95 मिळकती आहेत. या पैकी बहुतांशी भाडेपट्ट्याची मुदत संपुष्ठात आलेली आहे. ज्यांच्या भाडेपट्ट्यांच्या मिळकतींचे करार संपुष्ठात आलेले आहेत. त्यांनी लवकरात लवकर भाडे कराराचे नुतनीकरण करून घ्यावे, अन्यथा आपल्या मिळकती देखील वन विभाग सील ठोकुन आपल्या ताब्यात घेईल, असा इशारा वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी दिला आहे. वन विभागाच्या या भूमिकेमुळे वन विभागाच्या मिळकत धारकांमध्ये एकच खळबळ माजली असुन मिळकत धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.